चिपळूणमध्ये काँग्रेसमध्ये नगराध्यक्षपदासाठी पक्षात धुसफूस वाढली, 33 नगरसेवकपदासाठी इच्छुक,

banner 468x60

आगामी नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसमध्ये चांगलीच राजकीय खळबळ माजली आहे. चिपळूण शहरात झालेल्या जिल्हा आढावा बैठकीत नगराध्यक्षपदासाठी तब्बल तीन इच्छुक पुढे आले, तर २८ नगरसेवक पदांसाठी ३३ अर्ज दाखल झाले. यामुळे पक्षातील स्पर्धा आता उघडपणे समोर आली असून, पदाधिकाऱ्यांमध्ये धुसफूस आणि शाब्दिक खडाजंगी झाल्याचे वृत्त आहे.

banner 728x90

बैठक धवल प्लाझा सभागृहात झाली होती. या बैठकीला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष रामचंद्र दळवी, सरचिटणीस शशांक बावचकर, श्रद्धा ठाकूर, जिल्हाध्यक्ष सोनललक्ष्मी घाग, तसेच सर्व तालुकाध्यक्ष, युवक व महिला काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.

सुरुवातीला नगराध्यक्षपदाची चर्चा सुरू झाली आणि पहिले नाव समोर आले तालुकाध्यक्ष लियाकत शाह यांचे. पण काही पदाधिकाऱ्यांनी ॲड. जीवन रेळेकर यांचे नाव पुढे केले. यावरूनच चर्चा तापली आणि “पक्षासाठी कोण किती योगदान देतो” इथपर्यंत बोलाचाली गेली.

दरम्यान, तिसरे नावही पक्षाकडे अर्जाद्वारे दाखल झाले असल्याची माहिती आहे, पण पहिल्या दोन नावांवरच इतका गदारोळ झाला की तिसऱ्या उमेदवाराबाबत बैठक गप्पच राहिली!

नगरसेवकपदासाठी ३३ अर्ज:
२८ जागांसाठी ३३ उमेदवारांनी अर्ज दाखल केल्याने काही प्रभागांत दोन ते तीन इच्छुक समोर आले आहेत. त्यामुळे तेथेही छोटेखानी धुसफूस सुरू आहे.

महाविकास आघाडीचा धर्म की स्वबळाचा संकल्प?
बैठकीत काही पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले की, नगराध्यक्षपद महाविकास आघाडीकडून सन्मानपूर्वक न मिळाल्यास काँग्रेस स्वबळावर निवडणुकीला सामोरे जाईल.
लोकसभा व विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने उद्धवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) यांना साथ दिली असली तरी, आता स्थानिक पातळीवर राजकीय समीकरणे पुन्हा बदलण्याची शक्यता दिसते.

सध्याच्या परिस्थितीकडे पाहता, काँग्रेससाठी ही निवडणूक मतदारांपेक्षा आतल्या घरातील गटबाजी जास्त आव्हानात्मक ठरण्याची शक्यता आहे. जिल्हाध्यक्ष सोनललक्ष्मी घाग यांच्या पुढेही “तीन नगराध्यक्ष, ३३ नगरसेवक आणि अनेक मतप्रवाह” असा मोठा पेच उभा आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *