दापोली सीमा शुल्क विभागाने एक मोठी कारवाई केली आहे. विश्वसनीय माहितीच्या आधारे १७ ऑक्टोबर २०२५ रोजी पहाटे केलेल्या शोध मोहिमेत ४ किलो ८३३ ग्रॅम वजनाचे ‘अंबरग्रीस’ जप्त करण्यात आले असून, या प्रकरणी चार आरोपींना अटक करण्यात आली आहे.
सीमा शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांच्या पथकाला ‘अंबरग्रीस’ची (व्हेलची उलटी) अवैध वाहतूक सुरू असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीनुसार, दापोली येथील एस. टी. स्टँडजवळ एका मारुती वॅगन आर वाहनाचा पाठलाग करून ते अडवण्यात आले.
वाहनाच्या तपासणीदरम्यान, पांढऱ्या रंगाच्या छटा असलेले तपकिरी रंगाचे घन पदार्थ – म्हणजेच ४ किलो ८३३ ग्रॅम वजनाचे ‘अंबरग्रीस’ जप्त करण्यात आले. हे ‘अंबरग्रीस’ सुगंधी द्रव्यांमध्ये वापरले जाते आणि त्याची आंतरराष्ट्रीय बाजारात मोठी किंमत असते, परंतु वन्यजीव संरक्षण कायद्यामुळे त्याची विक्री प्रतिबंधित आहे.
अवैध वाहतुकीसाठी वापरलेले मारुती वॅगन आर वाहन देखील जप्त करण्यात आले. तसेच, या कृत्यात सामील असलेल्या चार लोकांना ताब्यात घेण्यात आले.
ताब्यात घेण्यात आलेल्या चारही व्यक्तींकडून विविध कागदपत्रे आणि इलेक्ट्रॉनिक वस्तू जप्त करण्यात आल्या आहेत. वन्यजीव (संरक्षण) अधिनियम, १९७२ चे उल्लंघन केल्याप्रकरणी या चार आरोपींना दापोली येथील
न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडीत पाठवले आहे. पुढील तपासासाठी हे प्रकरण आता वन्यजीव संरक्षण/महाराष्ट्र वन विभागाच्या अधिकृत अधिकाऱ्यांकडे सुपूर्द करण्यात आले आहे.
सीमा शुल्क अधीक्षक (प्रतिबंधक आणि गुप्तचर) श्री अतुल व्ही. पोटदार यांच्या नेतृत्वाखालील या पथकात प्रतीक अहलावत, रामनिक सिंग (निरीक्षक) यांच्यासह सुहास विलाणकर, करण मेहता, प्रशांत खोब्रागडे, गौरव मौर्या, हेमंत वासनिक समावेश होता. वन्यजीव (संरक्षण) अधिनियम, १९७२ नुसार अशा घटना निदर्शनास आल्यास तत्काळ वन विभाग, सीमा शुल्क विभाग किंवा पोलीस विभागाला कळवावे, असे आवाहन सीमा शुल्क विभागाने नागरिकांना केले आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













