राजापूर : मोकाट गुरांमुळे अपघात; तहसिलदारांचे कडक निर्देश

Screenshot

banner 468x60

मोकाट गुरांमुळे होणाऱ्या त्रासावर व अपघातांबाबत प्रशासनाने अखेर कडक भूमिका घेतली आहे. शहरातील मुख्य रस्त्यांसह हातिवले, कोंडेतर्फे सौंदळ, रानतळे व डोंगरतिठा या चार प्रमुख ठिकाणी मोकाट जनावरांमुळे नागरीकांना व वाहतुकीला होणारा धोका लक्षात घेऊन तहसिलदार कार्यालयाने तातडीने कठोर कारवाईचे आदेश जारी केले आहेत.

banner 728x90

उपविभागीय अधिकारी यांच्या निर्देशानुसार तहसिलदार विकास गंबरे यांनी १३ ऑक्टोबर रोजी एका महत्वपूर्ण आदेशाद्वारे संबंधित सर्व विभागांना त्वरित कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहेत.


या आदेशानूसार मोकाट जनावरांच्या त्रासावर नियंत्रण मिळवण्यासाठी विविध शासकीय विभागांची समन्वय समिती स्थापन करून त्यांना विशिष्ट जबाबदाऱ्या सोपवण्यात आल्या आहेत. गटविकास अधिकारी यांना या संपूर्ण कारवाईचे समिती प्रमुख म्हणून काम पाहण्याचे आणि सर्व विभागामध्ये समन्वय साधण्याचे निर्देश देण्यात आले अहेत. सर्वात महत्वाची कारवाई पोलीस निरीक्षक यांच्यामार्फत होणार असून त्यांना मोकाट जनावरांच्या मालकांवर
थेट कायदेशीर गुन्हे नोंदवण्याचे निर्देश दिले गेले आहेत. त्यामुळे आता मोकाट जनावरे रस्त्यावर सोडणाऱ्या मालकांना कठोर कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागणार आहे.

त्याचबरोबर पशूवैद्यकीय अधिकारी यांना मोकाट आढळलेल्या सर्व जनावरांची ईयर टॅगिंग म्हणजे कानावर ओळख क्रमांक लावण्याची प्रक्रिया तत्काळ पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यामुळे जनावरांचा मालक कोण आहे हे निश्चित करणे प्रशासनाला सोपे होणार आहे. या कारवाईत स्थानिक पातळीवर मदत करण्यासाठी
पोलीसपाटील यांना महत्वाची भूमिका दिली गेली आहे.

हातिवले, कोंडेतर्फे साँदळ, धोपेश्वर (रानतळे) व कोंडेतर्फे राजापूर (डोंगरतिठा) येथील पोलीसपाटीलांना मोकाट जनावरांच्या मालकांची ओळख पटवून ती माहिती पोलिसांना पुरवण्यास आणि त्यांना सहकार्य करण्यास सांगण्यात आले आहे.


या कारवाईचा शेवटचा टप्पा म्हणून ग्रामविकास विभागाला महत्वाची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यांना मोकाट जनावरांच्या मालकांची ओळख पटवण्यास मदत करण्यासोबतच जर मोकाट जनावरांचा
मालक कोणत्याही परिस्थितीत आढळला नाही तर अशा जनावरांचा तत्काळ लिलाव करण्याची कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत. या आदेशामुळे प्रशासनाने आता मोकाट जनावरांचा प्रश्न गांभीर्याने घेतला असून तत्काळ संयुक्त कारवाईमुळे नागरीकांना या त्रासातून दिलासा मिळण्याची शक्यता आहे. तहसिलदार विकास गंबरे यांनी संबंधित सर्व यंत्रणांना वरीलप्रमाणे कार्यवाही तत्काळ सुरू करण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत. या आदेशाची प्रत उपविभागीय अधिकारी राजापूर यांच्याकडे माहितीसाठी सादर करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *