यवतमाळ, चिपळूण आणि आता पुण्यात ‘ट्रेड विथ जाझ’ (TradeWithJazz – TWJ) या कथित गुंतवणूक कंपनीविरोधात फसवणुकीचा गंभीर गुन्हा दाखल झाला आहे. पुणे शहरात कर्वेनगर पोलीस ठाण्यात या कंपनीच्या तब्बल २३ प्रतिनिधींवर ६ कोटी १० लाख २८ हजार ७६० रुपयांची फसवणूक केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. या घटनेमुळे जिल्ह्यातील हजारो गुंतवणूकदार धास्तावले आहेत.
कर्वेनगर पोलीस स्थानकात गुरुवारी, २ ऑक्टोबर रोजी हा गुन्हा दाखल करण्यात आला. ‘TWJ’ कंपनीने आकर्षक परताव्याचे आमिष दाखवून अनेक नागरिकांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घातल्याचे तक्रारीत नमूद आहे.
गुन्हा दाखल झालेल्या २३ आरोपींमध्ये कंपनीचा मूळ संचालक समीर नार्वेकर (रा. TWJ, पुणे, वारजे माळवाडी) आणि त्यांची पत्नी नेहा समीर नार्वेकर यांचा समावेश आहे. याव्यतिरिक्त, फसवणुकीच्या या प्रकरणात पुण्यातील कंपनीच्या अनेक प्रतिनिधींचाही सहभाग आहे.
या यादीत प्रतिक जासतकर, रोहित मस्के, मुनाफ मुकादम, स्वप्निल पवार, अमित विश्वनाथ बालम, किरण कुंडले, सुरज सँकासने, प्रणव बोरडे, संकेश घाग, सिद्धेश पाटील, अविनाश कदम, सचिन पाटील, देवा घाणेकर, स्वप्निल देवळे, सौरभ गोरडे, प्रसन्ना मंगेश करंदीकर, मोहन कोरगांवकर, माहेश्वरी पाटणे, रघूवीर महाडीक, ऋषीकेश सुधीर पाटील, सोनाली पाटील आणि इतर काही जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अल्प काळात मोठे आर्थिक फायदे मिळवून देण्याच्या नावाखाली ‘TWJ’ ने अनेक नागरिकांना ‘ट्रेडिंग’ आणि ‘गुंतवणूक योजनां’मध्ये पैसे गुंतवण्यास प्रवृत्त केले. सुरुवातीला काही ठिकाणी परतावा मिळाल्याने अनेकांनी अधिक रक्कम गुंतवली. मात्र, त्यानंतर परतावा मिळणे बंद झाले आणि गुंतवणूकदारांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले.
राज्याच्या विविध भागांतून ‘TWJ’ विरोधात तक्रारी येत असताना, आता पुण्यातही इतक्या मोठ्या रकमेची फसवणूक उघड झाल्याने, कंपनीवर विश्वास ठेवून पैसे गुंतवलेल्या हजारो गुंतवणूकदारांमध्ये चिंतेचे आणि संतापाचे वातावरण पसरले आहे. पुणे पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असून, पुढील कारवाईकडे आता सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













