राजापूर : नवेदर येथे गणपती विसर्जनादरम्यान वीस वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू

banner 468x60

गणेशोत्सवाचा उत्साह शिगेला पोहोचलेला असतानाच राजापूर तालुक्यातील कोंडसर बुद्रुक, नवेदर येथे एका तरुणाचा गणपती विसर्जन करताना बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे गणेशोत्सवाच्या आनंदावर विरजण पडले असून, परिसरात शोककळा पसरली आहे.

banner 728x90

विक्रांत संतोष पोकळे (वय २०) असे या मृत तरुणाचे नाव आहे.
या वर्षीचा गणेशोत्सव राजापूर तालुक्यात मोठ्या उत्साहात साजरा झाला. मंगळवारी गौरी गणपतींचे विसर्जन भक्तिमय वातावरणात पार पडत असतानाच ही दुर्दैवी घटना घडली. नवेदर येथील ग्रामस्थ नेहमीप्रमाणे गावातील गणपतींचे विसर्जन गावातीलच एका तळ्यात करत होते. सायंकाळी विसर्जन सोहळा पार पडल्यानंतर सर्व ग्रामस्थ आपापल्या घरी परतले.


मात्र, बराच वेळ झाला तरी विक्रांत पोकळे घरी परतला नाही. त्यामुळे कुटुंबीयांना चिंता वाटू लागली. त्यांनी तातडीने वाडीतील ग्रामस्थांच्या मदतीने विक्रांतची शोधाशोध सुरू केली. त्यावेळी, ज्या तळ्यात गणपती विसर्जन करण्यात आले होते, त्याच तळ्यात विक्रांत बुडून मयत झाल्याचे निदर्शनास आले.


गावातील एका उत्साही तरुणाचा अशाप्रकारे अचानक मृत्यू झाल्याने नवेदर गावावर शोककळा पसरली आहे. गणेशोत्सवाच्या आनंदी वातावरणात ही दुर्दैवी घटना घडल्यामुळे संपूर्ण गाव शोकमग्न झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *