खेड : अखेर 22 तासांच्या शोधकार्यानंतर मंगेश पाटील याचा मृतदेह सापडला

banner 468x60

खेड तालुक्यातील भोस्ते गावात दीड दिवसांच्या गणपती विसर्जनावेळी एक दुर्दैवी घटना घडली. काल (गुरुवार) सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास गणपती विसर्जन करताना नदीपात्रात बुडून मंगेश पाटील या तरुणाचा मृत्यू झाला आहे. खेड तालुक्यातील अलसुरे-भोस्ते गावात दीड दिवसाच्या गणपती विसर्जनावेळी गुरुवारी सायंकाळी एक दुर्दैवी घटना घडली.

banner 728x90

जगबुडी नदीत बुडून मंगेश पाटील (वय ४०) या तरुणाचा मृत्यू झाला. त्यांच्यासोबत असलेला दुसरा तरुण कसेबसे पोहत बाहेर आल्याने त्याचा जीव वाचला. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. भोस्ते येथील पाटीलवाडीचे रहिवासी असलेले मंगेश पाटील यांच्या घरी यावर्षी पहिल्यांदाच बाप्पाचे आगमन झाले होते. गुरुवारी, गणेशमूर्ती विसर्जनासाठी मंगेश आणि त्यांच्यासोबत आणखी एक तरुण जगबुडी नदीपात्रात उतरले.

मात्र, पाण्याचा प्रवाह अचानक वाढल्याने दोघेही बुडू लागले. दुसऱ्या तरुणाने कशीबशी पोहत नदीचा किनारा गाठला, पण मंगेश पाटील मात्र प्रवाहाच्या जोरदार प्रवाहामुळे बुडाले.


खेड नगर परिषदेचे अग्निशामक दल, खेड शहरातील विसर्जन कट्टा पथक आणि खेड रेस्क्यू टीम घटनास्थळी दाखल झाले. सोबतच, एनडीआरएफचे पथकही तातडीने मदतीसाठी पोहोचले. या सर्व यंत्रणांनी रात्रभर मंगेश पाटील यांचा शोध घेतला, पण त्यांना यश आले नाही.


या दुर्दैवी घटनेची माहिती मिळताच माजी आमदार संजय कदम यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्याचप्रमाणे, खेडचे उपविभागीय पोलीस अधिकारी, पोलीस निरीक्षक, तहसीलदार आणि प्रांताधिकारी यांनीही घटनास्थळी उपस्थित राहून बचावकार्याचा आढावा घेतला. मंगेश पाटील यांच्या पश्चात पत्नी आणि दोन मुले असा परिवार आहे. या घटनेने त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, परिसरात शोककळा पसरली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *