रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्गावर गॅस टँकर कोसळला, वाहतूक पूर्णपणे ठप्प, स्फोटाचा धोका

Screenshot

banner 468x60

मुंबई-गोवा महामार्गावर हातखांब येथील शाळेजवळ सोमवारी रात्री सुमारे ११:१५ वाजता एक गॅस टँकर पुलावरून खाली कोसळल्याची गंभीर घटना घडली. या अपघातामुळे दोन्ही बाजूंची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली असून नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

banner 728x90


प्राथमिक माहितीनुसार, अपघातग्रस्त टँकरमधून गॅसची गळती होत असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे स्फोटाचा संभाव्य धोका लक्षात घेता प्रशासन सतर्क झाले असून तातडीने आवश्यक त्या उपाययोजना राबविल्या जात आहेत.


घटनास्थळी पोलिसांसह आपत्कालीन बचाव पथके दाखल झाली असून परिसराला संरक्षित करण्यात आले आहे. खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाने मुंबई-गोवा महामार्गावरील दोन्ही मार्गांवरील वाहतूक तत्काळ थांबवली आहे. वाहने इतर पर्यायी मार्गाने वळवण्याचे काम सुरू आहे.


स्थानिक प्रशासनाने नागरिकांना आवाहन केले आहे की, त्यांनी अपघातस्थळाच्या परिसरात जाणे टाळावे. तसेच वाहनचालकांनी शांतता राखत प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


अद्याप कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती नाही, मात्र गळती रोखण्याचे आणि टँकर सुरक्षित करण्याचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरू आहेत. पुढील तपास व कार्यवाहीसाठी अधिकाऱ्यांचे पथक घटनास्थळी दाखल झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *