दापोली : सुवर्णदुर्गमुळे दापोलीचे नाव जगाच्या नकाशावर, युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत अधिकृतपणे समाविष्ट

banner 468x60

छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याचे प्रतीक असलेले बारा किल्ले युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत अधिकृतपणे समाविष्ट करण्यात आले आहेत. यामध्ये दापोलीतील सुवर्णदुर्ग किल्ल्याचा समावेश आहे. हा किल्ला शिवरायांच्या पराक्रमाचे प्रतिक आणि कान्होजी आंग्रे यांच्या शौर्याची एक आठवण आहे.

banner 728x90

याच सुवर्णदुर्गने दापोलीचे नाव जगाच्या नकाशात कोरले असून दापोलीसाठी आणि रत्नागिरी जिल्ह्यासाठी ही अभिमानाची बाब आहे तर सुवर्णदुर्ग किल्ल्यामुळे दापोलीच्या पर्यटनाला महत्त्व आले आहे.


हर्णे हे गाव पूर्वी सुवर्णदुर्ग या नावाने ओळखले जायचे. कारण हर्णे गावातील हर्णे बंदाराजवळ छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेला सुवर्णदुर्ग हा जलदुर्ग इतिहासाची साक्ष देत वर्षांनुवर्षे उभा आहे. समुद्रातील खडकावर हा किल्ला बांधण्यात आला आहे. दूरदृष्टी असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी या बंदराचे महत्त्व ओळखून आपले आरमार या ठिकाणी वसवले व किल्ल्यांचीही मजबुती केली.

दापोली तालुक्यात आजही दिमाखात वसलेला सुवर्णदुर्ग या नावाप्रमाणेच येथे मौल्यवान वस्तूंची आणि किमती साहित्याची लयलूट असायची. हर्णे बंदराजवळच सुवर्णदुर्ग या किल्ल्याबरोबरच कनकदुर्ग, फत्तेगड, भूईकोट किल्ले उभे आहेत.


मराठी योद्धे सरखेल कान्होजी आंग्रेंचा पूर्ण वचक या परिसरावर होता. तुळाजी आंग्रे यांच्या हा किल्ला ताब्यात असताना 1755च्या एप्रिलमध्ये इंग्रजांनी पेशव्यांच्या मदतीने या किल्ल्यावर स्वारी केली. तीन दिवस घनघोर लढाई झाली आणि किल्ला इंग्रजांच्या ताब्यात आला. पुढे ब्रिटिश अंमलाखाली हर्णे म्हणजेच सुवर्णदुर्ग तालुक्याची निर्मिती करण्यात आली व तालुक्याचे महत्त्व या परिसराला प्राप्त झाले. खेड, मंडणगड, दापोली हा भाग सुवर्णदुर्ग तालुक्यात येत असे.


या सगळ्या ऐतिहासिक घडामोडींमुळे हर्णे बंदर हे अनेक ज्ञात- अज्ञात ऐतिहासिक घडामोडींचे साक्षीदार असून अनेक आठवणी या बंदराच्या उदरात दडल्या आहेत, सुवर्णदुर्ग किल्ला इंग्रजी ‘व्ही’ अक्षराच्या आकाराच्या खडकावर वसला आहे. या किल्ल्यामुळे

बंदरात वावरणाऱ्या बोटींना समुद्रात उद्भवणाऱ्या आपत्कालीन परिस्थितीत सुरक्षित निवारा देण्याचे ठिकाण बनले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *