रत्नागिरी शहरातील कोकणनगर येथे राहणाऱ्या 33 वर्षीय गृहिणीने आपल्या पतीसह सासरच्या चौघांविरोधात हुंड्यासाठी छळ, मारहाण आणि तीन तलाक देण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. सन २०१६ पासून ते २३ जून २०२५ या कालावधीत हा प्रकार घडल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादीचे पती सोहेब शाहीद मणेर (वय ३५ वर्षे), सासरे शाहीद फकी मणेर (वय ५८ वर्षे), सासू सौ. रफीया शाहीद मणेर (वय ५१ वर्षे) आणि नणंद सहेमा ताहीरअली खान (वय ३१ वर्षे, सर्व रा., उद्यमनगर, रत्नागिरी) यांनी पैशांची मागणी करत माहेरहून पैसे आणण्यासाठी वारंवार छळ केला.
तसेच, त्यांना तीन मुली झाल्या या कारणावरून राग मनात धरून शिवीगाळ, दमदाटी करत हाताने चापटाने मारहाण केली, केस ओढले आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.
याव्यतिरिक्त, फिर्यादीचे पती साहेब शाहीद मणेर यांनी वारंवार ‘तलाक तलाक तलाक’ असे बोलून त्यांच्याशी असलेले नाते संपवण्याचा प्रयत्न केला.
फिर्यादी यांनी राजापूर न्यायालयात त्यांच्याविरोधात दाखल केलेला खटला मागे घेण्यासाठी त्यांचा मानसिक आणि शारीरिक छळ करण्यात आल्याचेही तक्रारीत म्हटले आहे.
याप्रकरणी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ चे कलम ८५ (पती किंवा पतीच्या नातेवाईकांकडून महिलेवरील क्रूरता), ११५(२) (इच्छेने दुखापत करणे), ३५२ (शांतता भंग करण्याच्या उद्देशाने अपमान करणे), ३(५) आणि मुस्लिम महिला (विवाहाच्या अधिकारांचे संरक्षण) कायदा २०१९ चे कलम ४ (तीन तलाक देण्यावर बंदी) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास रत्नागिरी शहर पोलीस करत आहेत.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta Live, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
Editor – Tejas Borghare
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*