चिपळूण : रस्त्याच्या नावाने बोंब, सूचना न देता टाकलेले गतिरोधक, दोन दिवसांत 5 दुचाकीस्वार जखमी

banner 468x60

चिपळूण शहरातील मार्कंडी येथील कराड रोडवर नगर परिषदेने कोणतीही पूर्वसूचना न देता अचानक उभारलेल्या गतिरोधकांमुळे अपघातांची मालिका सुरू झाली आहे. अवघ्या दोन दिवसांत ४ ते ५ दुचाकीस्वार घसरून पडून जखमी झाल्याच्या घटना घडल्या आहेत.

banner 728x90


मार्कंडी परिसरातील युनायटेड स्कूलजवळ दोन तर सुवर्ण भास्कर पेट्रोल पंपाजवळ दोन असे एकूण चार स्पीड ब्रेकर टाकण्यात आले आहेत. मात्र या ठिकाणी स्पीड ब्रेकर असल्याची कोणतीही पूर्वसूचना देणारे फलक, रिफ्लेक्टर किंवा पांढरे पट्टे (रोड मार्किंग) करण्यात आलेले नाही. त्यामुळे रात्रीच्या वेळी तसेच वेगात जाणाऱ्या वाहनचालकांसाठी हे गतिरोधक अत्यंत धोकादायक ठरत आहेत.


या अपघातांमध्ये मार्कंडी येथील रहिवासी अनिल फटकरे हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्या डाव्या हाताला फ्रॅक्चर झाले आहे. पुढील उपचारासाठी हाताच्या हाडात प्लेट बसवावी लागणार असल्याची माहिती मिळाली आहे.
अचानक उभारलेल्या या गतिरोधकांमुळे वाहनचालकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. हे स्पीड ब्रेकर नेमके कोणाच्या शिफारसीवर आणि कोणत्या निकषांनुसार टाकण्यात आले, असा सवाल दुचाकीस्वार उपस्थित करत आहेत. आधीच कराड रोडवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असताना नियोजनशून्य पद्धतीने गतिरोधक टाकून नगर परिषदेला नेमके काय साध्य करायचे आहे, असा प्रश्न नागरिकांकडून विचारला जात आहे.


दरम्यान, नगरपरिषदेने तातडीने या गतिरोधकांवर योग्य सूचना फलक, पांढरे पट्टे व रिफ्लेक्टर बसवावेत तसेच अपघात टाळण्यासाठी आवश्यक सुधारणा कराव्यात, अशी जोरदार मागणी स्थानिक नागरिक व वाहनचालकांकडून करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *