चिपळूण : सरकारी योजनेच्या नावाखाली ४२४ महिलांची फसवणूक; ३.६५ लाख रुपये उकळल्याचा आरोप, संशयित ताब्यात

banner 468x60

चिपळूण तालुक्यात सरकारी योजनेतून शिलाई मशिन देण्याचे आमिष दाखवून ४२४ महिलांकडून प्रत्येकी ६०० ते १,७०० रुपये प्रमाणे एकूण ३ लाख ६५ हजार ९७० रुपये उकळण्यात आल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. पैसे भरूनही अनेक महिने उलटून गेल्यानंतरही शिलाई मशिन न मिळाल्याने संतप्त महिलांनी सोमवारी चिपळूण पोलीस ठाण्यात धाव घेत लेखी तक्रार अर्ज सादर केला.

banner 728x90

या प्रकरणी सुभाष सकपाळ (रा. देवघर, ता. गुहागर) याला पोलिसांनी ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली आहे. मनिषा संतोष खेडेकर, श्रेया शंकर पाटेकर, रुचिता रणजित कदम, स्वरा स्वप्निल घारे, रिया राजेंद्र देवळेकर यांच्यासह अनेक महिलांनी तक्रार दाखल केली आहे.

तक्रारीनुसार, सकपाळ याने चिपळूण तालुक्यातील महिलांना सरकारी योजनेखाली शिलाई मशिन मिळेल, असे सांगून नोंदणी व प्रक्रिया शुल्काच्या नावाखाली पैसे घेतले. २० ते २५ दिवसांत मशिन मिळेल, असे आश्वासन देण्यात आले होते. मात्र, ठरलेला कालावधी उलटून गेल्यानंतरही कोणत्याही महिलेला मशिन देण्यात आले नाही. विचारणा केल्यावर टाळाटाळीची उत्तरे दिली जात असल्याचा आरोप महिलांनी केला आहे.

फसवणुकीचा संशय बळावल्याने संतप्त महिलांनी मुंबई–गोवा महामार्गावरील शिवाजीनगर बसस्थानक परिसरातील एका खासगी कार्यालयावर धडक दिली. यावेळी महिलांनी सकपाळ याला जाब विचारत तीव्र संताप व्यक्त केला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन सकपाळ याला ताब्यात घेतले. त्यानंतर सर्व महिला पोलीस ठाण्यात दाखल झाल्या.

विशेष म्हणजे, या प्रकरणातील बहुतांश महिला सर्वसामान्य व आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील आहेत. दरम्यान, या प्रकरणात फसवणुकीचा गुन्हा दाखल होण्याची शक्यता असून संबंधित सरकारी योजना नेमकी कोणती होती, जमा केलेली रक्कम कुठे वापरण्यात आली आणि या प्रकारात आणखी कोणी सहभागी आहे का, याबाबत पोलिसांकडून सखोल तपास सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *