चिपळूण शहरातील बहादूरशेख नाका येथे चिपळूण नागरी पतसंस्थेच्या कथित गैरकारभाराविरोधात सुरू होणाऱ्या उपोषणादरम्यान तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली असून, या घटनेप्रकरणी चिपळूण पोलीस ठाण्यात दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
एका फिर्यादीवरून वृत्तांकनासाठी गेलेल्या पत्रकारावर मारहाण, शिवीगाळ, दमदाटी आणि साहित्य चोरीचा गुन्हा दाखल झाला आहे, तर दुसऱ्या फिर्यादीवरून उपोषणकर्ते रुपेश पवार व रवींद्र पवार यांच्याविरोधात ॲट्रॉसिटीचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. दोन्ही गुन्ह्यांचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी. बेले हे करीत आहेत.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. २५ मार्च २०२६ रोजी दुपारी सुमारे १२ वाजण्याच्या सुमारास बहादूरशेख नाका, चिपळूण येथे चिपळूण नागरी पतसंस्थेच्या गैरकारभाराविरोधात रुपेश सुरेश पवार (रा. खेड) हे उपोषणास बसणार होते. या उपोषणाचे वृत्तांकन
करण्यासाठी दूरदर्शनचे पत्रकार दीपक दिलीप भागवत हे कॅमेरामन रुपेश साळुंखे यांच्यासह घटनास्थळी गेले होते. त्यावेळी १० ते १५ जणांच्या जमावाने त्यांना अडवून “तू कसला पत्रकार, तू कसले शूटिंग करतो?” असे म्हणत शिवीगाळ, दमदाटी व मारहाण केल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे. तक्रारीनुसार, संबंधितांनी हाताच्या थपडा, लाथाबुक्यांनी मारहाण केली, तसेच फिर्यादी दीपक भागवत यांच्या साईड बॅगमधील आयडी कार्ड व इतर साहित्य चोरीस गेल्याचेही नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणी पत्रकार दीपक दिलीप भागवत (रा. रत्नागिरी) यांनी दिलेल्या तक्रारीवरून अनोळखी १० ते १५ जणांविरोधात चिपळूण पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. नं. ८२/२०२६ दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यात भारतीय न्याय संहिता २०२३ अंतर्गत कलम १८९(२), १९०, १९१(२), ३०३(२), ११५(२), ३५२, ३५१(२), ३५१(३) तसेच महाराष्ट्र प्रसार माध्यम व्यक्ती आणि प्रसार माध्यम संस्था (हिंसा आणि मालमत्तेचे नुकसान प्रतिबंधक) अधिनियम २०१७ चे कलम ४ अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पोलीस नोंदीनुसार हा गुन्हा दि. २५ मार्च २०२६ रोजी सायंकाळी ६.३६ वा. दाखल करण्यात आला.
दरम्यान, या घटनेप्रकरणी दुसरी फिर्याद अभिषेक चंद्रकांत मोहिते यांनी दिली असून, त्यांच्या तक्रारीवरून उपोषणकर्ते रुपेश पवार व रवींद्र पवार यांच्या विरोधात ॲट्रॉसिटी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या तक्रारीतील नेमके आरोप आणि त्यामागील कारणांचा तपशील पोलीस तपासातून पुढे येणार आहे. त्यामुळे या प्रकरणाला आणखी गंभीर वळण मिळाले आहे.
या संपूर्ण घटनेत एकीकडे पत्रकारावर हल्ला आणि वृत्तांकनात अडथळा आणल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे, तर दुसरीकडे आंदोलनकर्त्यांविरोधात अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल झाल्याने हे प्रकरण केवळ स्थानिक वादापुरते मर्यादित राहिलेले नाही. पत्रकारांच्या सुरक्षिततेचा प्रश्न, लोकशाही मार्गाने सुरू असलेल्या आंदोलनांचे स्वरूप आणि सार्वजनिक ठिकाणी निर्माण होणारा तणाव या तिन्ही अंगांनी ही घटना चर्चेचा विषय ठरत आहे.
दोन्ही गुन्ह्यांचा तपास मा. उपविभागीय पोलीस अधिकारी बेले हे करीत असून, या प्रकरणात घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज, प्रत्यक्षदर्शींची साक्ष, व्हिडिओ चित्रीकरण आणि संबंधित व्यक्तींची विधाने यांच्या आधारे तपास पुढे नेला जाणार आहे. दोन्ही बाजूंनी गंभीर स्वरूपाचे आरोप झाल्यामुळे या घटनेचे नेमके सत्य आणि जबाबदारी कोणाची, हे पोलीस तपास पूर्ण झाल्यानंतरच स्पष्ट होणार आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













