राजापूर : ‘बारसू’चा प्रकल्प नेमका काय आहे?

banner 468x60

कोकणात राजापूर बारसू सोलगाव येथे प्रस्तावित असलेल्या रिफायनरी प्रकल्पावरून सध्या रण पेटले आहे. स्थानिकांनी या प्रकल्पाला जोरदार विरोध दर्शवला आहे. स्थानिकांनी अगदी आरपारच्या आंदोलनाचं पाऊल उचललं आहे. त्यामुळे ‘बारसू’कडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिले आहे. प्रस्तावित रिफायनरी जागेच्या सर्व्हेला ग्रामस्थांचा विरोध आहे. रिफायनरी प्रकल्पाला होणारा विरोध आणि जिल्हा प्रशासनाच्या भूमिकेने संघर्ष वाढलेला आहे. तूर्तास ग्रामस्थ व जिल्हा प्रशासनाच्या चर्चेची पहिली पार पडलीये. गुरुवारी पर्यावरण तज्ञ्ज यांच्या समवेत एक बैठक आयोजित करण्यात आली आहे. पण हा रिफायनरी प्रोजेक्ट नेमका काय आहे? यावरुन राजकारण का होतंय? कोणत्या पक्षाचं काय म्हणणं आहे, हे आपण समजून घेऊ…

कोकणात राजापूर तालुक्यातील नाणार येथील प्रस्तावित प्रकल्पाच्या रद्द झालेल्या अधिसूचनेनंतर आता बारसू सोलगाव परिसरात क्रूड ऑइल रिफायनिंग कंपनी प्रस्तावित आहे. तेल शुद्धीकरण क्षेत्रातील आरामको सौदी अरेबियातील क्रूड ऑइल उत्पादित करणारी करणारी मोठी कंपनी आहे. या आरामको कंपनीबरोबर केंद्र शासनाचा उपक्रम असलेल्या भारत पेट्रोलियम कार्पोरेशन लि. हिंदुस्तान पेट्रोलियम कार्पोरेशन लि. इंडियन ऑइल यांच्या संयुक्त विद्यमाने हा रिफायनरी प्रकल्प या परिसरात सुमारे १३ हजार एकर जागेवरती प्रस्तावित आहे. थोडक्यात तेल शुद्धीकरण करणारा हा मोठा प्रकल्प आहे.

महाराष्ट्र शासनाचा उपक्रम म्हणून महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाद्वारे हा प्रकल्प राजापूर तालुक्यातील बारसू, गोवळ, धोपेश्वर तसेच नाटे या परिसरात नियोजित आहे. सध्या या प्रकल्पासाठी या ठिकाणी माती परीक्षणासाठी ड्रीलिंग सर्व्हेचे काम सुरू आहे.

या परिसरातील ग्रामस्थांना आपल्या जागा या प्रकल्पासाठी द्यायच्या नाहीत. आमच्या येथील आंबा, मच्छी व्यवसाय, शेती हे सगळेच या प्रकल्पामुळे नष्ट होईल. हा प्रकल्प प्रदूषण करणारा आहे. त्यामुळे कोकणातील निसर्गाला, जैवविविधतेला, पर्यावरणाला या प्रकल्पाने बाधा पोहोचेल. त्यामुळे आमचा पारंपरिक शेती व्यवसाय, मत्स्य व्यवसाय, आंबा काजूच्या बागा नष्ट होतील, अशी भीती व्यक्त करत येथील ग्रामस्थांनी नियोजित प्रकल्पाला जोरदार विरोध दर्शवला आहे.

उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांनीच हा प्रकल्प व्हावा, यासाठी प्रयत्न केल्याचं सध्याच्या सत्ताधाऱ्यांचं म्हणणं आहे. या प्रकल्पाला बारसू सोनगाव परिसरात जागा सुचविणारे पत्र केंद्र शासनाला तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीच लिहिले होते. मात्र नागरिकांच्या तीव्र विरोधानंतर उद्धव ठाकरे एक पाऊल मागे आले. स्थानिकांचा या प्रकल्पाला विरोध असेल तर आमचाही विरोध असेल, असं उद्धव ठाकरे म्हणाले. त्यामुळे सध्या तरी शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाचा या रिफायनरीला विरोध आहे. महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या काँग्रेस व राष्ट्रवादीची भूमिका संदिग्ध आहे.

दुसरीकडे या प्रकल्पाला पहिल्यापासूनच भाजप आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा जाहीर पाठिंबा आहे. अशातच राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी मध्यम मार्ग स्वीकारत ग्रामस्थांजवळ चर्चा करा, त्यांना विश्वासात घ्या आणि मगच हा प्रकल्प इथे उभा राहण्याच्या हालचाली सुरु ठेवा, अशी भूमिका घेतली आहे. सत्तेत असलेल्या शिंदे फडणवीस सरकारला हा प्रकल्प या ठिकाणी आणायचा आहे. त्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. इतकेच नाही तर येथील उद्धव ठाकरे गटाचे राजापूरचे आमदार राजन साळवी यांनीही या प्रकल्पाला जाहीर पाठिंबा दर्शवला आहे.

स्वाभिमानी पक्षाच्या राजू शेट्टी यांनी विरोध दर्शवत ग्रामस्थांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. रयत क्रांती पक्षाचे शेतकऱ्यांचे नेते सदाभाऊ खोत यांचा मात्र या रिफायनरी प्रकल्पाला मागील एका दौऱ्यात पाठिंबा दिला आहे. त्यामुळे एकंदरीत राजकीय पक्षांच्या भूमिकेचा विचार केल्यास तूर्तास तरी शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाचा आणि राजू शेट्टी यांचा या प्रकल्पाला कडाडून विरोध दिसत आहे.

banner 728x90

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *