दापोली : गॅस सिलेंडरमुळे झाली दिशाभूल, अखेर पेटली दापोलीत चूल!

banner 468x60

वाढते गॅस दर आणि सिलिंडरची टंचाई यामुळे सर्वसामान्य नागरिकांसह व्यावसायिकांनाही अडचणींचा सामना करावा लागत आहे. अशाच परिस्थितीचे एक वेगळे चित्र आज दापोली शहरात पाहायला मिळाले. गॅस सिलिंडर उपलब्ध न झाल्याने एका हॉटेल व्यावसायिकाने अखेर पारंपरिक चुलीवर स्वयंपाक करण्याचा निर्णय घेतला.

banner 728x90 banner 728x90

शनिवार, १४ मार्च रोजी दापोलीतील फॅमिली माळ परिसरात ही घटना घडली. येथील एका हॉटेलमध्ये सकाळपासूनच चुल पेटवून जेवण बनवण्यास सुरुवात करण्यात आली. विशेष म्हणजे ज्या ठिकाणी हे हॉटेल आहे, त्याच्या अगदी शेजारीच HP Gas ची ‘मेहंदळे गॅस एजन्सी’ कार्यरत आहे. गॅस एजन्सी जवळ असूनही गॅस सिलिंडरची उपलब्धता न झाल्याने किंवा तांत्रिक अडचणींमुळे हॉटेल मालकाला चुलीचा आधार घ्यावा लागल्याची माहिती स्थानिकांनी दिली. या घटनेची शहरात चांगलीच चर्चा रंगली आहे.

गॅस एजन्सीच्या शेजारीच हॉटेल असूनही चुलीवर स्वयंपाक सुरू असल्याचे पाहून अनेक नागरिक आश्चर्य व्यक्त करत होते. काहींनी यावर विनोदी प्रतिक्रिया देत “गॅसच्या काळात पुन्हा चुलीची आठवण झाली” असेही म्हटले.


दरम्यान, चुलीवर बनवलेले जेवण चविष्ट असते, असा अनुभव अनेकांचा असल्याने काही खवय्यांनी याचा आनंदही घेतला. चुलीवर बनवलेले पदार्थ खाण्यासाठी ग्राहकांनी उत्सुकता दाखवल्याचेही दिसून आले. पारंपरिक पद्धतीने तयार केलेल्या जेवणाला वेगळीच चव असल्याने काही ग्राहकांनी हॉटेल मालकाचे कौतुकही केले.

वाढत्या गॅस दरांमुळे आणि कधी कधी निर्माण होणाऱ्या टंचाईमुळे छोट्या हॉटेल व्यावसायिकांना अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे या घटनेतून स्पष्ट झाले आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी पुन्हा जुन्या पद्धतीकडे वळण्याची वेळ येत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *