कळंबस्ते पेठ येथे मातोश्री अपार्टमेंट मधील फ्लॅट मालक गावी गेले असल्याच्या संधीचा फायदा घेत चोरट्याने बंद फ्लॅट फोडून रोख रक्कम ४५ हजार ५०० रुपये चोरल्याची घटना सोमवारी उघडकीस आली.
याप्रकरणी चिपळूण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कळंबस्ते पेठ येथील मातोश्री अपार्टमेंट मध्ये पहिल्या मजल्यावर राहणारे सदनिकाधारक हे १२ मे रोजी लातूर येथे मूळगावी गेले होते.
सदनिकाधारक गावी असतानाच त्याच अपार्टमेंटमध्ये राहणारे प्रमोद कदम यांनी सदनिकाधारकांच्या मोबाईलवर संपर्क साधून १७ मे रोजी इमारतीमध्ये चोरी झाली असून यात त्यांची बंद सदनिका फोडल्याची माहिती दिली.फ्लॅटधारक त्यांचे लातूर येथील काम आटोपून सोमवारी पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास आले असता कपाटातील कपडे व साहित्य हे अस्ताव्यस्त पसरलेले होते. त्यामुळे त्यांच्या घरात चोरी झाल्याचे उघड झाले. त्यानंतर त्यांनी पोलिसात चोरीची तक्रार दाखल केली आहे.