रत्नागिरी : सर्वात जलद निकाल पाहा कोकण कट्टा न्यूजवर, जिल्ह्यातील 4 नगरपरिषदा, 3 नगरपंचायतींचा उद्या निकाल

banner 468x60

रत्नागिरी जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा निकाल उद्या, रविवारी जाहीर होणार असून संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष या निकालांकडे लागले आहे. जिल्ह्यातील ४ नगरपरिषदा आणि ३ नगरपंचायतींच्या निवडणुकांची मतमोजणी उद्या पार पडणार आहे. गेल्या अनेक वर्षांपासून प्रशासकांच्या ताब्यात असलेल्या या संस्था आता पुन्हा लोकप्रतिनिधींच्या हातात जाणार असल्याने ही निवडणूक ऐतिहासिक मानली जात आहे.

banner 728x90


रत्नागिरी, राजापूर, चिपळूण आणि खेड या नगरपरिषदांवर डिसेंबर २०२१ पासून प्रशासक कार्यरत होते. तर गुहागर आणि देवरुख नगरपंचायतींवर मे २०२३ पासून प्रशासक नियुक्त होते. लांजा नगरपंचायतीवर फेब्रुवारी २०२५ मध्ये प्रशासक नेमण्यात आले होते. तब्बल ८ ते १० वर्षांनंतर या नगरसंस्थांच्या निवडणुका होत असल्याने मतदारांमध्ये उत्सुकता मोठ्या प्रमाणात पाहायला मिळाली.


सोमवारपासून या सर्व नगरसंस्थांचा कारभार पुन्हा एकदा लोकनियुक्त प्रतिनिधींच्या हाती जाणार असून विकासकामांना वेग मिळेल, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत. प्रशासक राजवटीमुळे रखडलेली अनेक विकासकामे आता मार्गी लागतील, असा विश्वास स्थानिक पातळीवर व्यक्त होत आहे.


राजकीयदृष्ट्याही ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची ठरली आहे. प्रशासक येण्यापूर्वी रत्नागिरी नगरपरिषदेत शिवसेनेचे वर्चस्व होते. चिपळूण आणि खेड नगरपरिषदांमध्येही चुरशीची राजकीय लढत पाहायला मिळत होती. राजापूरमध्ये काँग्रेस आणि शिवसेनेचे समसमान बलाबल होते. मात्र, राज्यातील बदललेल्या राजकीय समीकरणांमुळे यंदा महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात थेट सामना रंगला आहे.
दरम्यान, दापोली आणि मंडणगड नगरपंचायतींची मुदत संपणार नसल्याने त्या ठिकाणी सध्या निवडणुका झालेल्या नाहीत. त्यामुळे उद्या केवळ या ७ नगरसंस्थांचा निकाल जाहीर होणार आहे.


निकालांमुळे जिल्ह्यातील राजकीय समीकरणे स्पष्ट होणार असून आगामी विधानसभा व लोकसभा राजकारणावरही या निकालांचा परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे मतमोजणीदरम्यान प्रत्येक फेरीकडे राजकीय पक्षांसह सामान्य नागरिकांचेही लक्ष लागून राहणार आहे.
सर्वात जलद आणि अचूक निकालांसाठी कोकण कट्टा न्यूजवर लक्ष ठेवा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *