गेल्या आठवड्यापासून वातावरणात पुन्हा बदल झाला आहे. गेल्या तीन-चार दिवसांपासून ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने उकाडा वाढू लागला आहे.
सोमवारी दिवसभर ढगाळ वातावरणामुळे पाऊस कुठल्याही क्षणी पडण्याची शक्यता वाटत होती. ढगाळ वातारणामुळे तयार होऊ लागलेल्या हापूसवर तुडतुडे पडण्याच्या शक्यतेने बागायतदार धास्तावले आहेत. दरम्यान, जिल्ह्यात १ आणि २ एप्रिल या कालावधीत मेघगर्जनेसह पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.
गेल्या काही दिवसांपासून वातावरणात मोठ्या प्रमाणावर बदल होऊ लागले आहेत. मार्चपूर्वीच तापमानाचा पारा पहिल्यांदाच ३९ अंश सेल्सिअसवर गेला होता. त्यानंतर पुन्हा सकाळी आणि रात्री गारवा तर मध्येच मळभ आणि अधूनमधून पावसाचा शिडकावा असे वातावरणात झपाट्याने बदल होऊ लागले आहेत.
त्यामुळे या वातावरणामुळे सर्दी, ताप, घशाचे संसर्ग, पित्त आदी आजारांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे.गेल्या तीन चार दिवसांपासून पुन्हा किनारपट्टीवर कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने कर्नाटकाच्या किनाऱ्यावर चक्री वादळाची स्थिती निर्माण झाली आहे. याचा प्रभाव महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांवर होत असून काही भागात मुसळधार पाऊस पडत आहे.
रत्नागिरीतही सोमवारी सकाळपासूनच ढगाळ वातावरण असल्याने पाऊस पडेल की काय, असे वाटत होते. सायंकाळी मेघगर्जनाही होत होती. १ आणि २ एप्रिल रोजी जिल्ह्यात मेघगर्जनेसह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली असून आठवडाभर वातावरणही ढगाळ राहणार आहे. त्यामुळे उकाड्यातही कमालीची वाढ झाली आहे.दरम्यान, हापूसला सुरुवातीपासूनच या बदलत्या वातावरणाचा फटका बसू लागला आहे.
फळ तयार झाल्यानंतर वाढलेल्या तापमानामुळे हापूस भाजला असून काही ठिकाणी काळे डागही पडले आहेत. त्यातच आता ढगाळ वातावरणामुळे थ्रीप्स, तुडतुडा, फळमाशीचे संकट हापूससमोर असल्याने बागायतदार चिंताग्रस्त झाले आहेत. सध्या चक्रीवादळाच्या प्रभावामुळे वाऱ्याचा जोरही वाढल्याने आंबापिकाची गळही होत आहे. त्यामुळे या नैसर्गिक बदलाने बागायतदार हवालदिल झाले आहेत.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta Live, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
Editor – Tejas Borghare
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*